शिवजयंती आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन...
Read More
मनोगत
आयुष्यात पहिल्या पासुनच काहीतरी वेगळ करण्याची मनामध्ये जिद्ध होती. अध्यात्मिक व उद्योग नगरी असलेल्या पुणे जिल्हातील आंबेगाव तालुक्यात जेमतेम हजार लोकवस्ती असणाऱ्या गावडेवाडी या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात सन १९५८ साली माझा जन्म झाला. कुटुंबाला पहिल्यापासून अध्यात्माचा वारसा असल्यामुळे निस्वार्थपणे समाजासाठी काम करण्याची गोडी आपोआपच लागली.
माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची परिस्थिती व वडीलांना मदत करण्यासाठी मी १९७६ मध्ये मुंबई येथे आलो. भायखळा येथील संत सावता महाराज मंडई मध्ये सन १९८०पर्यत भाजीपाल्याचा व्यवसाय केला.
त्यावेळी मला भाजीपाला व्यापारातील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु या अडचणींना तोंड देण्याची जिद्द माझ्या वडिलांनी व सहकाऱ्यांनी निर्माण करून दिली. वडिलांचा व्यवसाय संभाळत असताना दादर येथील क्रांतीसिंह नानापाटील मंडईत भाजीपाला आडत व्यवसाय चालू करण्यास वडिलांनी प्रवृत्त केले. मी व्यवसाय करत असतांना….
मी व्यवसाय करत असतांना दादर मार्केट मध्ये चिखल, दलदल व पाऊस अशा अनेक समस्या पाहून प्रथम सन १९८६ मध्ये दादर मार्केट मध्ये दोन शेड कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईच्या व्यवस्थापनाला बांधण्यास प्रवृत्त केले व नंतर अनेक वेगवेगळ्या प्रश्नांची चाहूल लागली.
सार्वजनिक क्षेत्राचा जवळून अनुभव यावा म्हणुन चिंचपोकळी येथे सन १९८६ मध्ये सुरेश आचरेकर व्यायाम शाळेची स्थापना केली. त्याच माध्यमातून जयभवानी क्रीडा मंडळ, नवरात्री महोत्सव मंडळ, शिव छत्रपती कला क्रीडा मंडळ आदी विविध संस्थेचा प्रमुख पदभार सांभळून सन १९८० ते १९९६ मध्ये सामाजिक क्षेत्रातील अनुभव घेतला.
याच कालावधीत हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व भाषणाचा चाहता झालो. यावेळी शिवसेना हे वारे वेगळेच वाहत होते. शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना’ या चार अक्षरांशी जोडलो गेलो. समाजविकासाचे ध्येय उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी निघालेल्या या ध्येयवेड्या शिवसेनेत एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून मी सामील झालो.
परंतु यावेळी राजकारण व समाजकारणात नवीन असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या याचदरम्यान आमचे मार्गदर्शक मा. श्री. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्याकडून सार्वजनिक क्षेत्रातील विविध समस्या निवारण्याचे धडे जवळून अनुभवता आले आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे काम करू लागलो.
या दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी करता आल्या यामधे दादरमधील व्यापाऱ्यांना संघटीत करून सन १९९० मध्ये प्रथम गावडेवाडी को. ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. सर्व व्यापारी मित्रांच्या आर्थिक प्रश्नांची तड लावून त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला. सन १९९२ मध्ये दादर भाजीपाला मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या माध्यमातून अनेक व्यापारी व खरेदिदार, कामगार बांधवांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
भाजीपाला घाऊक व्यापार, मुबईतून नव्या मुंबईत स्थलांतर करण्याचा आदेश शासनाने काढला त्यावेळी भावी काळाची गरज ओळखून व्यापारी खरेदीदार व कामगार यांना नव्या मुंबईमध्ये कमी कमीत दरामध्ये घरे मिळावीत म्हणून सिडको कडून नेरूळ येथे निवासी भुखंड मिळविला.
त्यावर १९९२ मध्ये श्री गणेश को. ऑप. हौसिंग सोसायटी स्थापन करून व्यापारी, खरेदीदार व कामगार यांना ४८० रूपये स्के. फुट या वाजवी दराने घरे मिळवून देण्यात मला यश आले व सदर सोसायटीतील घरेही फक्त भाजीपाला व्यापारी व कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश शासनाकडून करून घेतला.
त्यानंतर मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबई येथे स्थलांतरित झाले. मार्केट स्थलांतरण नियोजन बद्ध व स्वसंरक्षणासहित स्थलांतरीत व्हावे ही इच्छा मनामध्ये धरून त्यासाठी भरपूर प्रयत्न केले. सन १९९३ मध्ये आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने महात्मा फुले को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकपदी निवडून आलो. त्यानंतर सोसायटीतील अनेक कामांना हातभार लावून व्यापारी व कामगार बांधवांच्या समस्या सोडविण्याचा आजपर्यत प्रयत्न करत आहे.
त्यावेळी संस्थेतील सभासदांची सेवा करण्यासाठी सकाळी १० ते १ यावेळे मध्ये महात्मा फुले को. ऑप. क्रेडिट सोसायटी वाशी शाखेमध्ये उपस्थितीत राहून सभासदांचे अनेक प्रश्न सोडवीले.
सन १९९४ मध्ये भाजीपाला व्यापारी मित्रमंडळा मार्फत क्रांतिसिंह नानापाटील मंडई २११ परवाना धारकांना त्याच मार्केट मध्ये गाळे मंजुर करण्यास महापालिकेला भाग पाडले. तसेच नवी मुंबई व बृहन्ममुंबई व उपनगर परिसरातील भाजीपाला व्यवसायातील व्यापारी, कामगार, खरेदीदार बंधु नवी मुंबई येथे स्थलांतर झाले होते त्यांच्या मुलामुलींना शिक्षण घेता यावे म्हणून आमचे मार्गदर्शन मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पूणे या संस्थेच्या माध्यमातून नेरुळ येथे शाळा व कॉलेज मध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केले.
त्यांनतर २००० मधे श्री संत ज्ञानेश्वर माऊली एज्युकेशन & कल्चरल सोसायटी ट्रस्ट स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात भक्कम योगदान देण्यात यशस्वी झालो तर ते आजपर्यंत ज्ञानदानाचे कार्य करत आहे. हेच कार्य करत असताना माझ्या सर्वसामान्य व्यापारी बांधवांचा व नागरिकांचा भरगोस पाठींबा आणि प्रेम मिळत गेले.
सन २००० साली कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई मधे संचालक म्हणून निवडून आलो आणि खऱ्या अर्थाने राजकीय आखाड्यात काम करायला लागलो. परंतु तरीही त्यावेळी समाजहित लक्षात घेऊन कधीही कुठलेही राजकारण न करता विकासाला महत्व दिले. बाजार समितीमध्ये सिमेंट रस्ते, पाणपोई निर्माण केल्या. २८५ गाळे , एक्स्पोर्ट इम्पोर्ट साठी व्ही टी एस निर्माण केला. अशे अनेक कामे यावेळी करण्यात यश आले. सलग दोन वेळा सन २००८ पर्यंत बाजारसमितीवर यशस्वी रित्या काम करू शकलो.
याच कामाच्या जोरावर सन २००५ मधे प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलो रात्रंदिवस जनसामान्यांनी कामे केली. एक वेगळी उमेद घेऊन कार्य करत राहिलो त्याच कार्याच्या जोरावर सन २०१० मधे पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. याच काळात महत्वाची उपमहापौर पदाची जबाबदारी २०१२ साली मिळाली. याच काळात ज्वेल ऑफ नवी मुंबई हा शहराचा मानाचा तुरा समजला जाणारा प्रकल्प उभा केला याचे मोठे समाधान आहे. या काळात असे अनेक मोठे कार्य करता आले. आणि हाच सर्वसामान्य मुंबईकरांचा भरवसा आणि प्रेम पाठीशी स्वीकारून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि पुन्हा त्याच जोमाने लोकांच्या सेवेसाठी कार्य करत राहिलो.
याच काळात २०१९ साली सर्वात कठीण वेळ तेव्हा आली जेव्हा पक्षाचे नेते व सर्व नगरसेवक पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात सामील झाले त्यावेळी मी आणि माझी मुलगी असे दोनच नगरसेवक पक्षाच्या सोबत खंबीरपणे सोबत राहिलो. खूप दबाव आणि इतरही गोष्ठी झाल्या परंतु ठाम राहून पक्षाचे कार्य करत राहिलो. याचीच पावती म्हणून आदरणीय पवार साहेबांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवली. यानंतर अवघ्या काही दिवसातच २०१९ साली बेलापूर विधानसभा लढण्याची संधी मिळाली. अगदी कमी वेळेत कुठलिही तयारी नसताना, सर्व नेत्यांनी पक्षाला रामराम केला असताना सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या प्रेमाच्या जीवावर जवळपास पंचेचाळीस हजार मतदानरुपी प्रेमच मिळाले. यात निसटता जरी पराभव झाला असला तरी सर्वसामान्य लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद खूप मिळाले.
पराभवाने खचून न जाता सर्वसामान्य लोकांसाठी दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कामाला लागलो आणि तेच कार्य सर्वसामान्य लोकांचा भरवसा टिकवून आजपर्यंत तुमच्या सोबत कार्य करत आहे.
या काळात अनेक पदे जबाबदाऱ्या निभावल्या. सन २०२२ मधे पुन्हा एकदा आदरणीय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि अतिशय जोमाने ती स्वीकारून आज शिंदे साहेबांच्या शिवसेनेत राजकीय व सामाजिक कार्य करत आहे.
आज पर्यंत माझ्या सामाजिक व राजकीय जीवनाची पन्नास वर्षे सामान्य लोकांसाठी वाहून काम करतोय आणि पुढेही करत राहील.
फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे……….! जय महाराष्ट्र……!
आपलाच,
श्री. अशोक अंकुशराव गावडे
( मा. उपमहापौर, नवी मुंबई महानगरपालिका )